Ad will apear here
Next
मायनस पॉइंट माहिती असणे हाच खरा प्लस पॉइंट असतो!!


आपल्यापैकी प्रत्येकात जसे प्लस पॉइंट असतात, तसेच मायनस पॉइंट पण असतातच की! नेमके ते मायनस पॉइंट काही वेळा लोक मुद्दाम बोलण्यात आणून आपलं मानसिक खच्चीकरण करू पाहतात अन् आपणही त्यात काही वेळा अडकतो. मुळात समोरच्याच्या मनात वेगळं असतं, की माझ्यापेक्षा हा जास्त उजवा कसा? भला मेरे कमीज से उसकी कमीज सफेद क्यूँ? हा खरा मुद्दा असतो. म्हणून मग समोरची व्यक्ती तुम्हाला ‘खाली’ दाखवण्याच्या प्रयत्नात तुमचे मायनस पॉइंट जास्त ठळक करून तुम्हाला सांगतेच, शिवाय इतरांना पण सांगत बसते अन् तुम्ही अधिक निराश होता. खरेच मी इतका वाईट आहे का? किंवा खरेच मी इतकी चुकीची वागतेय का? असे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारत बसून चांगलं चाललेलं तुमचं रूटिन तुम्हीच डिस्टर्ब करून घेता. (अर्थात तुमचे मायनस पॉइंट सांगणारे काही चांगले हितचिंतकदेखील असतात. नाही असे नाही. ते ओळखता आले तर त्यांच्याकडून चांगल्या टिप्स घेऊन आपण आपल्यात सुधारणा करू शकतो) पण हल्लीच्या काळात असे ‘शुभ’ हितचिंतक कमी झालेत हेही सत्य आहे.

म्हणूनच आज त्या विषयावर थोडं बोलावंसं वाटलं.

अर्थात त्यासाठी सोदाहरण बोललं की लगेच कळेल म्हणून सांगतो. मी स्वतः मराठवाड्यात जन्मलेला, मराठी माध्यमात शिकलेला. नंतर उच्च शिक्षणासाठी पुण्यात आलो, तर कॉलेजमध्ये पण जवळपास सगळेच हाय फाय आणि कॉन्व्हेंटवाले. अनेकदा ते सगळे इंग्रजीत बोलायचे. मी आपला मग इंग्लिश पिक्चर पाहताना जसे भोवतीचे हसले की आपण हसायचं, लोकांनी टाळ्या वाजवल्या की आपण वाजवायच्या. या गटातला मी! त्यामुळे नकळत इंग्लिशचा न्यूनगंड मनात पक्कं घर करून बसलेला. इंग्लिश बोलता न येणं हा मायनस पॉइंट, हेही मान्य होतं. मित्रांत असलो की अनेकदा याची टिंगल पण व्हायची.

मनातल्या मनात स्वतःला खूप शिव्या घालायचो. म्हणून त्याकाळात शेवटी मी आमच्या हॉस्टेलमध्ये सुरू असलेला स्पोकन इंग्लिश क्लास पण लावलेला; मात्र तिथं मन काही केल्या रमेना. I = we , he, she, it = they असं काही तरी सुjt असायचं. माझं लक्ष लागत नाहीये हे पाहून त्या चव्हाण मॅडमनी पण शेवटी माझा नाद सोडला. मग नोकरी, नंतर बिझनेस असं करत करत करिअर सुरू झालं. मोठ्या कंपनीची कामं मिळू लागली. तिथंही माझी गोची व्हायची. ऑफिसर लोक इंग्लिशमध्ये आणि मी ‘yes, no thank you’ पुरता इंग्लिश. बाकी सगळं हिंदी किंवा मराठीत! अर्थात काम चांगलं असल्याने सगळ्यांनी त्या वेळी साथ दिली. अगदी जीवन पवार यांनीसुद्धा. नॅशनल लेव्हलच्या आयटी कंपनीचे ते डायरेक्टर; पण मला सांभाळून घेऊन कामं देत देत मोठं केलं.

तरी इंग्रजीचा मायनस पॉइंट होता तिथंच होता. आणि मग असेच ‘एफबी’वर ओळख झालेल्या एका मैत्रिणीने (ती अगदी हायफाय आणि इंग्लिश लिटरेचर वाचणारी) तिने बोलता बोलता माझ्यातील त्या उणिवा (म्हणजे पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स) वगैरे घालवण्याचा प्रयत्न केला. मीही थोडंफार मनावर घेतलं; पण तरी शंभर टक्के काही केल्या जमेना; पण त्या निमित्ताने किमान चार-पाच वाक्यं फर्ड्या इंग्लिशमध्ये जमायला लागली. त्याच काळात ‘सोशल मीडिया कसा वापरावा’ या संदर्भात विविध ठिकाणी माझी व्याख्याने सुरू झाली होती. अशातच पुण्यातील एका मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटकडून निमंत्रण आलं. ते तर जणू पुण्यातील ऑक्सफोर्ड टाइप. आता आली का पंचाईत? तरी नेहमीप्रमाणे ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ म्हणत तिथं गेलो. अन् लेक्चरच्या सुरुवातीला पाच भाषांत सर्वांचं स्वागत केलं. (आप सभी का, इस समारोह पर तहे दिल से स्वागत, हू तम्हारा बद्धानु हार्दिक स्वागत करू छू, तुम्हा सर्वांचे आज या ठिकाणी मनापासून स्वागत वगैरे)

आणि एक क्षण पॉज घेऊन म्हटलं, ‘भाषा कोणती, हे महत्त्वाचं नसतं, तर आपण काय बोलतोय ते समोरच्याला कळतं आहे का, हे जास्त महत्त्वाचं असतं. मला काय? म्हणाल तर गुजरातीत पण बोलेन; पण तुम्ही सगळे इथले मराठी आहात. नियम म्हणून इंग्लिशमध्ये शिकताय; मात्र स्वप्नं अजूनही तुम्हाला मराठीतच पडतात ना?’

यावर सगळ्यांनी जोरात ‘हो’ म्हटले, अन् मी मग सुसाट मराठीत पूर्ण तासभर बोलत गेलो. सोशल मीडियाबद्दलच्या सर्व शंकांचेही नंतर निरसन केले. आणि प्रसन्न मनाने तिथून निघालो. त्या दिवशी मला कळलं, की इंग्रजी न येणं हा माझ्यातील मायनस पॉइंट असला तरी तो माहिती आहे हाच माझा प्लस पॉइंट. त्यामुळे न्यूनगंड नंतर निघून गेला.

डीडी क्लास : आपल्यात उणीव असणे वाईट नाही; पण ती आहे, हेच माहीत नसणे जास्त वाईट. उणिवा नसलेला माणूस अजून जन्मला नाहीये. कुणी कमी कुणी जास्त; पण सगळेच आपण उणिवांची लेकरे! मग किमान आपल्यातील उणीव आपण समजून घेऊ अन् त्यावर जमेल तसे ओव्हरकम करू या ना. अमुक एक मला येत नाही, म्हणून रडण्यापेक्षा त्यावर लढून जिंकूया ना? सर्वांत सुंदर मानल्या गेलेल्या मोरामध्ये पण उणीव आहे की तो पक्षी असूनही फार उंच उडू शकत नाही; पण म्हणून तो रडत बसला का? निराश झाला का? नाही! तर आपला आहे तोच पिसारा फुलवून तो जेव्हा छान लयबद्ध नाचतो तेव्हा सगळ्यांचे देहभान हरपते ना? मायनस पॉइंटला प्लस कसे करावे हे तर मोरसुद्धा शिकवून जातो की! हे पाहा अन् आजपासून आपल्या उणिवा हीच आपली ताकद समजून लढायला शिका. मग पाहा, प्रगती आपोआप सुरू होते.

- धनंजय देशपांडे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZOTCG
Similar Posts
पुन्हा कधीच आयुष्यात कुणाचा ‘ऑटोग्राफ’ घेतला नाही! लहानपणी अनेकांना असतो तसा मलाही मोठ्या लोकांच्या सह्या घेण्याचा व त्याचा संग्रह करण्याचा छंद होता. लातूरच्या दयानंद कॉलेजमध्ये गॅदरिंगला मंगेश पाडगावकर, क्रिकेटपटू एकनाथ सोलकर, जितेंद्र अभिषेकी अशी माणसे यायची. त्यांच्या सह्या घेतलेल्या. मिळेल त्या कागदावर सही घेऊन नंतर ती एका विशेष अशा रजिस्टरटाइप वहीत चिकटवून ठेवायचो
हातात हात, सौख्याची बरसात; सुटला हात तर मग, भकास एकांत... हातात हात घेऊन कोणी चालावे याबद्दल कसले नियम नाहीत अन् कसला कायदादेखील नाहीये ना? मग का लाजायचं? किंवा का ते टाळायचं? घ्या की कधी तरी जोडीदाराचा हात हातात अन् मस्त बागेत चार पावलं चाला. मग पाहा, काहीही न बोलता ‘मी तुझ्यासाठीच आहे’ ही भावना नक्की जोडीदाराच्या मनापर्यंत पोचेल अन् जगणं अधिक आनंदी होईल.
आकाशफुले...! जीए नावाचं गूढ थोडंसं उकलताना...! एखादा दिवस आयुष्याला असा काही धक्का देऊन जातो, की त्याची सुखद जाणीव प्रत्येक पावलासोबत जवळ राहते. तो दिवसही मनात वेगळा कप्पा तयार करून स्वतःहूनच त्यामध्ये जाऊन बसतो. अधूनमधून बाहेर डोकावतो, आणि नव्या दिवसावरही तो जुना, सुखद अनुभव गुलाबपाण्यासारखा शिंपडून जातो... अगदी अलीकडचा तो एक दिवस असाच, मनाच्या कप्प्यात जाऊन बसला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language